🥈कविता व कवितेवर आधारित प्रश्न
💡 लक्षात ठेवा
1.प्रथम कविता काळजीपूर्वक वाचा.
2.कवितेचा विषय व अर्थ समजून घ्या.
3.कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष दया.
4.कवितेवर किमान ३ प्रश्न विचारले जातात.
5.प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय समजपूर्वक वाचा व पारखून घ्या.
6.उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचा.
7.पर्यायी उत्तरांतील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
(स्वाध्याय) कविता व कवितेवर आधारित प्रश्न
प्र. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तरांच्या पर्याय- क्रमांकांची वर्तुळे रंगवा :
कविता 1
देवा तुझे किती। सुंदर आकाश
सुंदर प्रकाश। सूर्य देतो
सुंदर चांदण्या। चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर। पडे त्याचे
सुंदर ही झाडे। सुंदर पाखरे
किती गोड बरे। गाणे गाती
सुंदर वेलींची। सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले। देवा तुझी
इतुके सुंदर। जग तुझे जर
किती तू सुंदर। असशील !
1. 'इतुके सुंदर। जग तुझे जर' या ओळीतील ' तुझे' म्हणजे कोणाचे ?
(1) मुलांचे (2) माणसांचे (3) देवाचे (4) सूर्याचे
उत्तर:3) देवाचे
2. कवितेत सुंदर हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेले नाही ?
(1) आकाश (2) गाणे (3) फुले (4) चांदणे
उत्तर:2) गाणे
3. मुले कोणासारखी आहेत ?
(1) देवासारखी (2) वेलींसारखी (3) पाखरांसारखी (4) फुलांसारखी
उत्तर:4)फुलांसारखी
----------------------------------
कविता [2]
एक वाफ हलकी फुलकी,
तिला लागली एकदा डुलकी
झोपेत लागली चालायला,
उंच आभाळात तरंगायला
उंच गेल्यावरती मग,
तिचा झाला मऊ मऊ ढग
ढगाला लागली गार थंडी,
वाफेची उडाली घाबरगुंडी
हळूच पाहिलं वाकून खाली,
आईची तिला आठवण झाली
वाफेला आलं खूप खूप रडू,
धो-धो पाऊस लागला पडू.
1. वाफेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले ?
(1) तिला मुले पावसात भिजताना दिसली. (2) तिला आईची आठवण आली. (3) तिला मऊ मऊ ढग दिसले. (4) ती तरंगायला लागली.
उत्तर:2) तिला आईची आठवण आली.
2. वाफ उंच गेल्यावर ती कोण झाली ?
(1) मऊ ढग (2) पाऊस (3) फुलपाखरू (4) पतंग
उत्तर:1) मऊ ढग
3. वाफेचे रडू म्हणजे काय ?
(1) गारा (2) ढग (3) वारा (4) पाऊस
उत्तर:4) पाऊस
----------------------------------
कविता(3)
काय सांगते चिमणी तुम्हाला, काय सांगते चिमणी ?
खूश करा सर्वांना गाऊन गोड गाणी
काय सांगते मुंगी तुम्हाला, काय सांगते मुंगी ?
काम करा सदैव, नको झोपेची गुंगी
काय सांगते नदी तुम्हाला, काय सांगते नदी ?
तहान भागवा सर्वांची, आळस नको कधी
काय सांगतो वृक्ष तुम्हाला, काय सांगतो वृक्ष ?
सावली दया सर्वांना, नको फायद्यात लक्ष
काय सांगतो दिवा तुम्हाला, काय सांगतो दिवा ?
अंधार सारा घालवून, प्रकाश दयायला हवा
इतरांसाठी जगतो जगात, तोच खरा जगतो
त्याच्यापुढे सर्व फिके, तोच मरूनही उरतो
1. 'सर्वांची तहान भागवा' असा संदेश कोण देते ?
(1) झरा (2) मुंगी (3) नदी (4) चिमणी
उत्तर:3) नदी
2. चिमणी तुम्हांला काय सांगते ?
(1) आनंदाने चिवचिव करा.
(2) गोड गाणी गाऊन सर्वांना खूश करा.
(3) सदैव काम करीत राहा.
(4) सर्वांना प्रकाश दया.
उत्तर:2) गोड गाणी गाऊन सर्वांना खूश करा.
3. जीवनात खरा कोण जगतो ?
(1) इतरांसाठी मरतो तो (2) इतरांना सावली देतो तो (3)इतरांना फायदा करून देतो तो (4) इतरांसाठी जगतो तो
उत्तर:4) इतरांसाठी जगतो तो
----------------------------------
कविता(4)
नववर्षाचे स्वागत करूया दारी गुढी उभारू।
नाचू गाऊ मौजेने, नववर्ष झाले सुरू ।।धृ।।
लावू पताकांच्या माळा, रांगोळ्या काढू दारा।
लावू तोरण दाराला, अन् गुलाल उधळण करू ।।१।।
मंगलतेचा सुदिन आजचा, शुभ कार्याचा प्रारंभाचा
मंगलमयी हे वातावरण, आनंदाने भरू ।।२।।
असे आजचा सण मौजेचा, गोड गोड खाऊ खाण्याचा
चैत्रातील या प्रतिपदेचे, स्वागत आम्ही करू ।।३।।
1. नववर्षाचे स्वागत मुले कसे करणार आहेत?
(1) मौज करून (2) गाणी गाऊन (3) दारी गुढी उभारून (4) तोरणे बांधून
उत्तर:3) दारी गुढी उभारून
2. पुढीलपैकी कोणती गोष्ट मुले करणार नाहीत ?
(1) पताकांच्या माळा लावणे. (2) दाराला तोरण बांधणे. (3) सुंदर रांगोळी काढणे. (4) मंगल कलश पूजन करणे.
उत्तर:4) मंगल कलश पूजन करणे.
3. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे .........
(1) गुढीपाडवा (2) अक्षय्य तृतीया (3) रामनवमी (4) वटपौर्णिमा
उत्तर:1) गुढीपाडवा
----------------------------------
कविता( 5)
राजा राजा म्हणसी मजला आणि सांगसी काम कसे ?
गोष्टीमधला राजा बसतो, सिंहासन मज नाही तसे ?
राजा राजा म्हणसी मजला, प्रधानजी का नाही कुणी ?
घोडा नाही, सैन्यही नाही, कसा नाही ग शत्रू कुणी ?
म्हणू नको तू राजा मजला, खोटे बोलू नको उगा
नाही का तुज इतुके ठाऊक, तू आई मी बाळ तुझा.
1. राजाजवळ पुढीलपैकी कोणती गोष्ट नाही ?
(1) फक्त घोडा (2) फक्त सैन्य (3) फक्त प्रधान (4) घोडा, सैन्य व प्रधान या तिन्ही
उत्तर:4) घोडा, सैन्य व प्रधान या तिन्ही
2. कवितेत तक्रार करणारा कोण आहे ?
(1) आईचा बाळ (2) राणीचा राजा (3) राजाचा प्रधान (4) बाळाची आई
उत्तर:1) आईचा बाळ
3. वरील कवितेत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही ?
(1) जन्मदात्री (2) भूपाळ (3) सोबती (4) अश्व
उत्तर:3) सोबती
-----------------------------------
कविता(6)
देवा नारायणा तुमच्या मोजू का मी चुका ?
मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका
प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत ?
रंगीत फुलात वास घालणे विसरलात का घाईत ?
हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय ?
आणि एका पपईत हजार बिया होय ?
जरदाळूतल्या बदामांवर कशासाठी साल ?
अक्रोडाचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल !
आता निदान पुढच्या वेळी नीट करा सगळे
कावळे थोडे गोरे करा रंगीत करा बगळे.
1. देव कोणती गोष्ट विसरला आहे असे मुलास वाटते ?
(1) पपईमध्ये बिया कमी करण्यास
(2) बगळे रंगीत करण्यास
(3) रंगीत फुलात वास घालण्यास
(4) प्राजक्ताची फुले टिकाऊ करण्यास
उत्तर:(3) रंगीत फुलात वास घालण्यास
2. मुलांचे उगीचच हाल कशामुळे झाले ?
(1) आंब्यातील मोठ्या कोयमुळे
(2) अक्रोडावरील कठीण कवचामुळे
(3) प्राजक्ताच्या नाजूक फुलांमुळे
(4) बदामांवरील सालीमुळे
उत्तर:2) अक्रोडावरील कठीण कवचामुळे
3. हापूस आंब्याविषयी मुलाने कोणती चूक दाखवली आहे?
(1) छोटी कोय (2) नाजूक कोय (3) रंगीत कोय (4)मोठी कोय
उत्तर:4)मोठी कोय

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा