🥉 संवाद व त्यावर आधारित प्रश्न
💡(लक्षात ठेवा )
1.दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला 'संवाद' म्हणतात.
2. संवाद कोठे झाला ? केव्हा झाला? कोणाकोणांत झाला? संवादाचा विषय काय होता? असे कोण म्हणाले? या प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
3. संवाद काळजीपूर्वक वाचा. स्थळ, वेळ, प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींची संख्या, उपस्थित व्यक्तींची संख्या नीट लक्षात घ्या.
4. फक्त मान डोलावणारी, बाय-बाय असा इशारा करणारी, टाळ्या वाजवणारी, हसणारी व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींमध्ये येत नाही.
5. सूर्योदय, सूर्यास्त, दिवे लागणीची वेळ, पक्षी घरट्याकडे येणे, गुरे गोठ्याकडे परतणे, सूर्य डोक्यावर येणे, मुले शाळेत जाण्याची वेळ अशा सूचक शब्दांवरून संवादाची वेळ लक्षात येऊ शकते.
6. संवादावर किमान ३ प्रश्न विचारले जातात.
7.तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा
(स्वाध्याय ) संवाद व त्यावर आधारित प्रश्न
(📖 नमुना संवाद)
प्र. पुढील संवाद वाचून त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
{ संवाद }
"अरे सदा, झाले का झाडांना पाणी घालून?"
"हो गुरुजी, आता काय करायचे?"
"आता गावातील पाणवठ्यावर जायचे आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व जलप्रदूषण कसे होते, याची माहिती घेऊ."
"नमस्कार गुरुजी!"
"नमस्कार काका! या."
"गुरुजी, शाळेचे नंदनवन केले तुम्ही! मुलांना कामात रमवलंत."
"मनापासून केलेल्या गोष्टीला सुंदर रूप येते काका."
"खरे सांगू गुरुजी, हे सर्व पाहिले की गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. तुमच्या झटण्याला आज अर्थ आला." सरपंच म्हणाले.
1. गुरुजी 'पाणी' हा पाठ कोठे शिकवणार आहेत ?
(1) शाळेत (2) वर्गात (3) पाणवठ्यावर (4) क्रीडांगणावर
उत्तर:3) पाणवठ्यावर
2. वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे?
(1) दोन (2) तीन (3) चार (4) पाच
उत्तर:2) तीन
3. वरील संवादात गुरुजींचा कोणता विशेष गुण दिसतो ? (1) ते वर्गात अभ्यास घेतात. (2) विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतात. (3) शाळेत कार्यक्रम करतात. (4) मुलांना अनुभवातून शिक्षण देतात.
उत्तर:4) मुलांना अनुभवातून शिक्षण देतात.
(📖सरावासाठी संवाद )
( संवाद 1 )
'श्रुती, अगं बाबा कोठे आहेत, पाहतेस का जरा?"
आई, विभाला सांग मी अभ्यास करतेय."
"थांब हं, बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते."
"आले गं आई, पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का?"
'विचार लवकर प्रश्न."
"आई पाऊस का गं पडतो?"
"श्रुती, पृथ्वी थंड राहावी, प्राणिमात्रांना, वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून."
"मग समुद्रावर पाऊस का गं पडतो?"
"मी सांगू का गं ताई?" विभा ओरडून म्हणाली. 'श्रुती, अगं किती प्रश्न विचारशील? बाबांना बोलावून आण पाहू. "आणते, आम्हांला शाळेत सोडायलाही त्यांना यायचं आहेच."
"आलो आलो मी. बागेत झाडांना पाणी घालत होतो."
आजोबा हे सर्व फक्त ऐकत होते.
1. संवाद केव्हा घडला असावा ?
(1) दुपारी (2) सकाळी (3) संध्याकाळी (4) रात्री
उत्तर:2) सकाळी
2. संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे?
(1) दोन (2) तीन (3) चार (4) पाच
उत्तर :3) चार
3. श्रुतीचा स्वभाव कसा आहे?
(1) चौकस (2) उद्घट (3) बेफिकीर (4) वेंधळा
उत्तर:1) चौकस
{ संवाद 2 }
"अगं, कसला विचार करतेस ?"
"अरे दादा, बाईंनी निबंध लिहायला सांगितलाय. कसा लिहू?"
"कोणते विषय दिले आहेत?"
"माझा आवडता सण, पावसाळा, सूर्य उगवलाच नाही तर..." "तुला कोणता विषय आवडलाय? त्याबद्दलची माहिती लिहून काढ."
" 'पावसाळा' हा विषय मला आवडलाय. मला निबंध लिहायला मदत करशील ना?"
"तू प्रथम मुद्दे लिहून काढ. मी वाचून तुला सांगेन."
"चालेल, बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी मुद्दे, कवितेच्या ओळी पहिल्यांदा लिहून काढते."
"मग तर अतिशय छान निबंध लिहिशील तू."
"माधव, तिला स्वतःलाच लिहू दे रे निबंध." आईने स्वयंपाकघरातूनच सूचना दिली.
1. संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे?
(1) तीन (2) दोन (3) चार (4) नक्की सांगता येत नाही
उत्तर:1) तीन
2. निबंध लिहिण्यासाठी कोणता विषय निवडला ?
(1) माझा आवडता ऋतू(2) सूर्य उगवलाच नाही तर... (3) पावसाळा(4) माझा आवडता सण
उत्तर:3) पावसाळा
3. निबंध कोण लिहिणार होते ?
(1) दादा (2) बहीण (3) आई (4) बाई
उत्तर: 2) बहीण
{ संवाद 3 }
"वांगी कशी किलो दिलीत?"
"अहो काकू, वांगी २० रु. पाव किलो,"
"राणी, महागच वाटतात ना गं, पण वांगी ताजी आहेत." "काकू, एकदम ताजी आहेत."
"आई, फ्लॉवर आणि मटारपण घे. छान पावभाजी कर आज."
"हो गं राणी, आजीने मेथी पण आणायला सांगितली आहे, मेथीचे पराठे करणार आहे आजी."
"मेथीची जुडी किती रुपयांना दिलीस? फ्लॉवर व वाटाणापण कसा दिलास ते सांग."
"मेथीची जुडी २० रु., फ्लॉवर ६० रु. किलो, मटार ८० रु. किलो."
"एक मेथीची जुडी, वांगी, फ्लॉवर व वाटाणा हे सर्व अर्घा अर्धा किलो दे."
" आई १३० रु. झाले गं सर्व. मी हिशेब केला."
"हुशार आहे हो मुलगी." भाजी मंडईत भाजी घ्यायला आलेले आजोबा म्हणाले.
1. संवाद कोठे झाला असावा ?
(1) घरात (2) शाळेत (3) बाजारात (4) अंगणात
उत्तर:3) बाजारात
2. संवादाच्या वेळी किती जण उपस्थित असतील ?
(1) चार (2) तीन (3) सहा (4) नक्की सांगता येत नाही
उत्तर:4) नक्की सांगता येत नाही
3. आजी कोणता पदार्थ बनवणार आहे ?
(1) पावभाजी (2) मेथीचे पराठे (3) भरलेली वांगी (4) फ्लॉवर व वाटाणा
उत्तर:2) मेथीचे पराठे
( संवाद 4 )
"श्यामची आई, मी नसते म्हटले की आणखी चार-पाच दिवसांत माझी रामरक्षा पाठ होईल तर श्याम माझ्यावर चिडला."
"भास्कर, विचारते हं त्याला."
"तुला मारीन नाही तर चालता हो," असंही म्हणाला.
"होय का रे श्याम? असे आपल्या मित्रांना म्हणावे का?" "तोच मला हिणवायला येतो. तुला कोठे येते रामरक्षा? असे म्हणाला. विचार त्यालाच, त्याने असे म्हटले की नाही ते." "आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला? तूसुद्धा सहा-सात दिवसांनंतर येणाऱ्या गोकुळाष्टमीपर्यंत रामरक्षा शीक.'
"बरं आई, तू शिकवशील ना मला?"
"होय बाळ."
भास्करची आई हे शांतपणे ऐकत होती.
1. संवादात किती जणांनी सहभाग घेतलेला आहे?
(1) चार (2) तीन (3) दोन (4) पाच
उत्तर:2) तीन
2. हा संवाद कोणत्या महिन्यात झाला असावा ?
(1) श्रावण (2) भाद्रपद (3) आषाढ (4) ज्येष्ठ
उत्तर : 1) श्रावण
3. संवादात भाग न घेणारी व्यक्ती कोण ?
(1) भास्कर (2) श्याम (3) श्यामची आई (4) भास्करची आई
उत्तर:4) भास्करची आई
{ संवाद 5 }
"एवढ्या भर उन्हात कसे काय आलात हंबीरराव ?" 'डॉक्टरसाहेब, तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलं बघा."
"ते कसं काय हो?"
"तुम्ही म्हणाला होतात की, उपचारानंतर तुम्ही स्वतः चालत जाल!"
"हे ऐकून समाधान झालं बुवा आपलं."
"तुमचं समाधान झालं हो, पण आमचं नाही ना."
"अहो हंबीरराव, चालत तर आलात तुम्ही. मग का समाधान नाही झालं तुम्हांला ?"
"कारण तुमची फी देण्यासाठी मला माझी गाडी विकावी लागली आणि स्वतः पायी चालत आलोय."
सर्व पेशंट, नर्स गालातल्या गालात हसू लागले.
1. संवाद कोणत्या वेळी घडला असावा?
(1) सकाळी (2) दुपारी (3) सायंकाळी (4) रात्री
उत्तर:2) दुपारी
2. संवादाच्या वेळी किती जण उपस्थित होते ?
(1) दोन (2) चार (3) तीन (4) नक्की सांगता येत नाही
उत्तर:4) नक्की सांगता येत नाही
3. हंबीररावांना चालत का यावे लागले?
(1) चालायच्या सवयीमुळे (2) डॉक्टरांनी चालण्यास सांगितले होते म्हणून (3) बस चुकली असावी म्हणून (4) डॉक्टरांच्या फीसाठी गाडी विकावी लागली म्हणून
उत्तर:4) डॉक्टरांच्या फीसाठी गाडी विकावी लागली म्हणून

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा