Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image
Marathi essay लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi essay लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

सप्टेंबर १८, २०२३

एका शेतकऱ्याचे / शेतमजुराचे आत्मकथन

 

               एका शेतकऱ्याचे / शेतमजुराचे आत्मकथन 



                     एखादे फुटत असे माझे जीवन आणि जगणे आहे. जगणे आणि मरणे यातील सीमारेषाच पुसून गेल्या आहेत. आमचे जगणे मरणाहून भयावह आणि मरणे त्याहून कंगाल असते. 

                बागेत काही फुलं सुगंधी असतात, काही फुलं सुरंगी असतात आणि काही फुलं रंगगंधहीन असतात. आजचा शेतकरीही असाच त्रिगुणी आहे. 

               सुगंधी शेतकरी म्हणजे लॉबीवाले शेतकरी. शुगर लॉबी, कॉटन लॉबी, आरेंज लॉबी असे लॉबीवाले शेतकरी आजचे अनभिषिक्त सम्राट आहेत. ते धनकनकसंपन्न आहेत. त्यांच्याजवळ बंगले आहेत, मोटारी आहेत, पैसा आहे, सारेच काही आहे. पैसा आहे म्हणून त्यांना प्रतिष्ठाही आहे. हे आर्थिक सशक्त व सामाजिक प्रतिष्ठित शेतकरी राजकारण खेळण्यात चतुर आहेत. ते सत्ताधीशांना पैसा पुरवतात आणि सत्तेच्या हाती असलेले कायदे आपल्या बाजूने झुकवून घेतात. पदावर कुणीही असला तरी खरी सत्ता यांचीच चालते, कारण यांच्याशिवाय राजकारणी, लोकांचे पान हालत नाही. एखाद्याला पदावर बसवणे किंवा त्याला खाली उतरवणे हे देखील त्यांना शक्य व्हावे. एवढे सामर्थ्य त्यांच्यात असते. त्यांचा गंध साऱ्या प्रदेशात दरवळतो, म्हणून हे सुगंधी शेतकरी ! 

               सुरंगी शेतकऱ्यांना असा गंध नसतो, पण त्यांना रंग निश्चितच असतो. निवडणुकीत ते आपला रंग दाखवूनच देतात. त्यांच्याजवळ घोडा गाडी नसली तरी उपजीविकेपुरती शेती निश्चितच असते. यांची संख्या मोठी आहे. आजवर ते विखुरलेले होते म्हणून त्यांची ताकद दिसून येत नव्हती. पण आता ते संघटित झाले आहेत, होत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे सुरंगी शेतकऱ्यांचे प्रतीक आहे. आपल्या संघटित शक्तीच्या बळावर ते कांद्याचा भाव ठरवू शकतात, त्यासाठी संघर्ष करू शकतात. त्यांच्यात विलक्षण राजकीय जागृती निर्माण झाली आहे. मंत्र्यासाठी 'चक्का जाम' करण्याची त्यांची हिंमत जगाने पाहली आहे. कर्जमुक्तीचा फायदाही त्यांनाच मिळाला आहे..

               रंगगंधहीन शेतकऱ्यांचा मात्र अजूनही कुणी वाली नाही, हे फारच थोड्या जमिनीचे मालक किंवा शेतमजूर आहेत. बाजारपेठेत कांदा पाठवण्याइतपत कांदा त्यांच्याजवळ नसतो. म्हणून कांद्याचा भाव वाढून न वाढून या शेतकऱ्यांवर त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण यांचे उत्पादन केवळ उदरनिर्वाहापुरते असते. यांना कुणी कर्ज देत नाही. कारण कर्ज घ्यायला हवे असलेले सोने यांच्याजवळ नाही. रक्ताचे पाणी करून ते माल पिकवतात. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते आपला माल आठवडी बाजारात आणतात. त्यालाही भाव मिळाला नाही म्हणजे रक्ताचा चिखल तुडवत असतात. शेतकरी सुखी तर जग सुखी असे निबंध त्यांच्या पोरांनी शाळेत लिहावेत, घरी आल्यावर मात्र त्या पोरांना पोटभर जेवायलाही देता येऊ नये असे जनावरांचे जिणे ते जगत असतात.

                 मी शेतमजूर आहे. आभाळाचा ढोल वाजत असतो. विजेचे नृत्य सुरू असते. पाऊस अंगाला चाबकाचे फटकारे मारत असतो आणि मी माझ्या दोन मुक्या सोबत्यांसोबत नांगरणी करत असतो. माझ्या या सोबत्यांना बोलता येत नाही आणि मला बोलता येत असूनही मी बोलू शकत नाही. भावना मात्र एकच आम्ही रक्ताचे पाणी देऊन मळा फुलवावा आणि मळेमालकाने पाण्याच्या भावात आमचे रक्त विकत घ्यावे. 

              शेतातल्या मातीतला काटा पायात रुततो. रक्त निघते, ते माझ्या मनाला रक्तबंबाळ करते, पण तरी मला या समाजरचनेचा क्रोध येत नाही, कारण तू आपले कर्तव्य कर, फळाची आशा धरू नकोस.' असे गीता सांगते. संध्याकाळी पोरांना पोटभर खाऊ घालता येत नाही. त्यांची व्यथा बघवत नाही, म्हणून देवळात निघून जातो. तेथे तुकोबाचा अभंग कानावर पडतो, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असू द्यावे समाधान पण उपाशी निजलेली पोरे पाहून चित्तो समाधान कसे असू द्यावे तेच मला कळत नाही. यावेळी ज्ञानेश्वर माझ्या साह्याला धावून येतात. गीतेच्या भावानुवादातून त्यांनी सांगितले आहे की सज्जनाच्या रक्षणाकरिता परमेश्वर अवतार घेत असतो. आज ना उद्या परमेश्वर अवतार घेईल आणि आपले दैन्य दूर होईल यावर माझी श्रद्धा बसते. मग देवळात जाऊन मी भजन करत बसतो. 

               हा अवतार दुष्टांच्या निर्दालनाकरितादेखील असतो. व्यापारी काळाबाजार आणि भेसळ करतात. न्यायाधीश पैसे खाऊन न्याय फिरवतात, शिक्षक पैशासाठी पेपर फोडतात. आमदार, खासदार पैशाच्या वजनाने जनतेचा विश्वासघात करून पक्ष बदलतात. कुणी 'भूखंड, तर कुणी 'बोफोर्स, आणि कुणी 'हवाला' प्रकरणात अडकतात. कुणी दाऊद इब्राहिम होतो, कुणी तस्कर बनतो, आणि समाजातले अनेक हर्षद मेहता पैशाची अफरातफर करतात. परमेश्वराचा अवतार एकाच वेळी या सर्वांचा विनाश कसा करणार? हाही प्रश्न माझ्या मनात उद्भवून जातो.

             'भारतीय शेतीपुढील आव्हाने' या लेखात अण्णासाहेब शिंदे म्हणतात की सर्व प्रगतीच्या मुळाशी सार्वजनिक धोरणे महत्त्वाची असतात. ती निश्चित स्वरुपाची ठरवली गेली पाहिजेत. शेतीच्या बाबतीत रक्तपात टाळून प्रगती कशी करता येईल याचा विचार करायला हवा असे ते म्हणतात. 

            मलाही रक्ताची तरल क्रांती मानवत नाही. पण त्याविना समाजरचना बदलण्याची थोडीही चिन्हे दिसत नाहीत आणि तीच्या मागन नही माझ्या आक्रोशाच्या ज्वालामुखीतून लाव्हा कधी उसळतो याची मी वाट पाहत आहे, कारण 'वरुनि शांत हा गिरी धुमसते आग परि अंतरी' **

सप्टेंबर १८, २०२३

एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत ...

                              एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत ..



“दोन दिवस वाट पाहण्यात गेले. दोन दुःखात गेले, हिशोब करते आहे किती राहले आहेत डोईवर उन्हाळे - 

माझं आयुष्य कष्ट करता करता आणि झिजून झिजून असंच संपणार का?

 लहानपणीही माझ्या जीवनाचं वाळवंट झालेलं होतं. आजीसोबत मोलमजुरी करुन जगणारी मी एक उपेक्षित मुलगी. ज्या वयात मैत्रिणींबरोबर खेळायचं, पुस्तक वाचायची, शिक्षण घ्यायचं मी वावरातून शहरात गवताचे भारे डोक्यावर वाहून आणत असे. डोईवरचे गवताचे भारे बाजारात नेताना पंधरा पंधरा वीस वीस कि.मी. अंतर पायी चालून जात असे. पक्वान्नं तर सोडाच पण बाजारात उघडयावर मिळणारी शेव खाण्याचीही माझी इच्छा गरिबीमुळं अतृप्त राहत असे. ताजी भाकर आणि त्यावर दूध हे माझे कधीही पूर्ण न झालेले बालपणीचे स्वप्न होते. 

               लग्न झालं तरी दिवस बदलले नाही. तोही मजूर आणि मीही मजूर, दोघांना मिळणा पैशातून कसाबसा संसार रेटायचा, कधी कुठे दुसऱ्यांच्या घरच्या टी. व्ही. वर एखादा सिनेमा बघायला मिळे. त्यातली नायिका बघून माझ्याही मनात कल्पनांचे तरंग उठत. स्वप्नात चंद्र येई तारे फुलत, रात्र धुंद होई पण नंतर मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. मी लहानपणी गाणी म्हणायची, माझा गळा गोड होता असे सारेच म्हणायचे. पण दारिद्रयानं माझा गळा केव्हा घोटला तेही मला कळलं नाही.

                 कष्टकरी स्त्रियांना तारुण्य हे वय नसतेच. एकतर त्या किशोरी असतात आणि नंतर एकदम प्रौढ होतात. संसार आणि कष्ट यामुळे त्यांचं तारुण्य मधल्यामध्येच लोप पावते. माझे कष्ट करणारे हात हे माझं सर्वस्व एम ते नेहमीच दारिद्रयाकडे गहाण राहलेले, आमच्या संसाराच्या वेलीला शेखर आणि सीमा अशी दोन फुलं आली. जीव त्यांच्यात गुंतला आणि माझ्या व्यथा, वेदना मी विसरुन गेले. 

                 एकदा माझा भाऊ मला भेटला. मी त्याची एकुलती एक बहीण असूनही तो भाऊबिजेला कधी येत नसे. पण यावेळी मात्र मी येईनच असं त्यानं वचन दिलं मी मनात हरखले. दिवाळीला गोडधड थोडं अधिक केलं. नवऱ्याच्या चोरुन भावाकरिता एका मडक्यात लपवून ठेवलं. किशोर सीमानं दुसऱ्या दिवशी सणाचं गोड मागितलं तेव्हा ते सारं तुम्हीच खाऊन संपवून टाकलं असं मी त्यांना सांगितलं. भाऊबिजेला संध्याकाळी मी चंद्राला ओवाळलं आणि भावाची वाट पाहत बसले. रात्र झाली पण तो आला नाही. वाटलं, बस चुकली असेल. येईल उद्या. दोन दिवस वाटेकडे डोळे लावून बसले. मुलं म्हणायची, 'मामा आला नाही का ग? मी डोळ्याला पदर लावायची. पंचमीच्या दिवशी मंडपात गोड काढलं न् पोरांना देऊन टाकलं, दारिद्रयात गणगोतही आपल्याला सोडून जातात. 

                  कुंतीनं कृष्णाला वर मागितला होता. माझ्यावर संकट येऊ दे पण त्यांच्याशी संघर्ष करण्याचं, ती झेलण्याचं धैर्य माझ्यात असू दे. प्रत्येक कष्टकरी स्त्री कुंती आहे असं मला वाटतं. उन्हात कधी कधी थंड वाऱ्याची झुळूक यावी तसे माझ्याही जीवनात हास्यविनोदाचे काही क्षण डोकावून गेले आहेत, नाहीच असं नाही. निवडणुका येतात, सभा भरतात, त्यात माणसांची गर्दी असायला हवी असते. आमच्या मजुरीच्या दुप्पट पैसे देऊन काही प्रतिष्ठित माणसं आम्हाला सभेला नेतात. विशिष्ट खूण झाली की आम्ही टाळ्या वाजवतो. आम्हाला रोजी मिळते म्हणून सभा कोणत्याही पक्षाची असली तरी आम्ही जातो. कारण कष्टकऱ्यांना पक्षच नसतो. 

                  कष्ट न करता आम्हाला जगता आलं असतं काय? जगता आलं असतं पण इमान विकावं लागलं असतं. ते मी विकलं नाही. म्हणून कष्टातही मला सुख वाटते. मुलं अंगाला बिलगतात तेव्हा अश्रूंचीही फुलं होतात. मी देखील उद्धव शेळके यांच्या 'जिद' मधील कौतिकसारखी समाजव्यवस्थेशी टक्कर देत देत जिद्दीने उभी आहे. स्वबळावर संसाराचा गाडा रेटताना मोडून पडण्याचे अनेक प्रसंग आले. पण प्रत्येक वेळी विझता विझता स्वतःला सावरलं आहे. माझे शील आणि स्वाभिमान शिवापलीकडे जपला आहे. पण कधी कधी अशी झुंज देताना मी पार कोसळते, देह जणू निष्प्राण होतो, एकही पाऊल पुढे टाकवत नाही इतकी थकून जाते. वाटतं, आता विश्रांती हवी. किती चालायचे, किती चालायचे अजुनि चालतोचि वाट! माळ हा सरेना विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना.

 

सप्टेंबर १८, २०२३

मेणबत्तीचे आत्मवृत्त

 

                                मेणबत्तीचे आत्मवृत्त 



वाढदिवस साजरे होतात आम्हाला नि विझायचे का वाढदिवस होतात? मेणबत्यांना वाढदिवसच नसतात।

           जे पिकतात ते उपाशी राहतात, जे विकतात ते मात्र तुपाशी खातात ही दुनियेची रीतच आहे. असं असलं तरी मेणबत्तीच्याही जीवनाला काही अर्थ आणि तिच्या विझण्यालाही काही मोल आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत कारण मी एक मेणबत्ती आहे. 

                    माझी एक बहीण होती. इतरांसाठी जळायचं नाही असं ठरवून जगणारी. ती आमच्या घराच्या फळीवर जाऊन बसली. कुणाचं लक्ष तिच्याकडे जाईना, चैनीत जीवन जगत होती. एक दिवस आमच्या घरातल्या एका छोट्या मुलीचा वाढदिवस संपन्न व्हायचा होता. घर सुशोभित झाले. फुलापानांची तोरणे लागली. घराची झाडझूड झाली. माझी बहीण घरच्यांच्या हाती लागते की काय म्हणून मी उत्सुकतेनं आणि भयभीत नजरेने तिच्याकडे पाहलं. ती घरच्यांच्या हाती लागली नव्हती पण झाडूच्या प्रहारानं जमिनीवर कोसळली होती. पाहते, तो तिला किड्यामुंग्यांनी कुरतडून टाकले होते. आता ती इतरांना प्रकाशही देऊ शकत नव्हती आणि स्वतःसाठीही धड जगू शकत नव्हती उलट माझ्यावर झाडूचे प्रहार तर झालेच नव्हते. पण कोमल हातांनी मला अलगद उचलून एका सजवलेल्या केकवर बसवण्यात आले होते. थोड्याच वेळात इतरांना मंद सुखकर प्रकाश देत देत माझी जीवन ज्योत जळणार होती. 

                   कुणाचे आयुष्य मोलाचे, समाधानाचे, आनंदाचे, माझं की माझ्या बहिणीचं? माझ्या मनात विचार आला. माझी बहीण कुजत कुजत मरण पावणार, इतरांना आपला उपयोग झाला नाही म्हणून दुःखी असणार. पण माझ्या जीवनाचे मात्र सार्थक होईल. शेवटच्या घटकेपर्यंत आपण साऱ्यांना प्रकाश दिला या सुखदायी तंद्रीत आपलं आयुष्य संपून जाईल.

                  मग मला या घरी केव्हातरी आलेली दोन माणसं आठवली. एक माणूस खूप श्रीमंत होता पण आला तेव्हा त्याचा चेहरा चितेने काळवंडून गेलेला होता. त्याच्यावर इन्कमटॅक्सची घाड पडली होती. ते प्रकरण निस्तरता निस्तरता त्याला भूकही लागेनाशी झाली होती. रात्र रात्र विचार करताना त्याची झोपही उडली होती. त्यातच त्याच्याकडे चोरी झाली. सोने नाणे लॉकरमध्ये होते म्हणून बीस लाख रुपयांचे सोने वाचले होते. पण पन्नास हजारांची कॅश चोरांनी पळवून नेली होती. पण त्या पन्नास हजारांसाठीही जणू त्याने हाय खाल्ली होती, तो दुःखी झाला होता. मला जाणवलं की तो इतरांसाठी नव्हे तर केवळ स्वतःसाठी जगत होता म्हणूनच दुःखी होता. याउलट एकदा आलेला तो हाडकुळा माणूस. त्याचे कपडेही जेमतेमच होते आणि दाढीही बोटभर वाढलेली होती. तरी तो खूप आनंदात होता कारण त्यानं सुरु केलेली एक चळवळ आता जोर धरु लागली होती. चळवळीतून तो लोकहित साधत होता. मनात विचार आला, 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. 'अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्या' या लघुनिबंधात नेमका हाच विचार मांडला आहे.. 

                      एकदा घरातली वीज गेली होती. एकदम भयाण काळोख पसरला. कुठं काही दिसेना. तेवढ्यात कुणीतरी मला अग्निज्योत दिली. मी स्वतः क्षणाक्षणानं आणि कणाकणानं झिजत जळत घराला उजाळा देऊ लागले. मी प्रकाश देताच मुलांच्या मनातली भीती दूर झाली. ती टाळ्या वाजवून बागडू लागली. माझ्या प्रकाशात खेळू लागली. 

                     रवींद्रनाथ टागोरांची कविता मला आठवली. सूर्य मावळतीला आला. आपण मावळल्यावर पृथ्वीला प्रकाश कोण देईल याचा तो विचार करू लागला. वणवा, तारे, चंद्र, इंद्रधनुष्य, झाडे,टेकड्या सर्वांना त्यानं विचारलं, पण पृथ्वीला प्रकाश दयायला कुणीही पुढं येईना. तेवढ्यात एक लहानशी पणती पुढं आली आणि विनम्रपणे म्हणाली 'भगवन्! तुमच्याएवढा नव्हे तरी जमेल तेवढा प्रकाश मी देईन साऱ्या मानवजातीचा नसेल पण एखादया कुटुंबाचा तरी अंधार मी दूर करेन.' महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती यांनी हेच केलं. संतानीही हे केलं... सारे समाजसुधारक म्हणजे समाजासाठी जळणाऱ्या व विझणाऱ्या मेणबत्याच नव्हे का? हेच आम्हा मेणबत्तीचं जीवितकार्य आहे. म्हणून माझ्या जीवनाचा आणि मृत्यूचाही मला अभिमान वाटतो. देवाच्या चरणी पडून पवित्र झालेल्या निर्माल्याहून मला माझे जीवन श्रेष्ठ वाटते कारण दगडी देवाची नव्हे तर आम्ही चालत्या बोलत्या मानवाची सेवा करत असतो. निर्माल्य पवित्र .. खरे पण ते देवरुप होत नसते. आम्ही मात्र आमचे सारे अस्तित्वच मानवाला वाहून निःशेष होत असतो.

                 इतरांना प्रकाश देण्यासाठी जीवनसर्वस्वाचे समर्पण करणारी मी भाग्यवती आहे. वाटतं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

सप्टेंबर १८, २०२३

एका जीर्ण वृक्षाचे आत्मवृत्त

 

                        एका जीर्ण वृक्षाचे आत्मवृत्त 



                       श्री ज्ञानेश्वरांच्या अजानवृक्षाशी नातं सांगणारा मी एक पिंपळवृक्ष आहे. सर्व वृक्षात मी पिंपळवृक्ष आहे असं परमेश्वरानं गीतेत सांगितलं आहे. जेव्हा प्रलय होईल आणि पृथ्वी पाण्यात डुबून जाईल तेव्हा केवळ एकच पिंपळपान शिल्लक उरेल आणि त्यावर बाळकृष्ण खेळत राहोल असा आम्हा पिंपळवृक्षांचा पुराणात महिमा कथिला आहे. अश्वत्थ नावानं ओळखले जाणारे आम्ही पिंपळवृक्ष आहोत याचा मला अभिमान वाटतो. या परंपरेतला, सोन्याच्या पिंपळाच्या कुळातला मी एक जी वृक्ष आहे. 

                     आता जीर्ण झालो आहे, पण तारुण्याचा बहर होता तेव्हा माझ्या डेरेदारपणाची, विशालत्वाची आणि सौंदर्याची लोक केवढी तारीफ करत असत. पांथस्थ उन्हाळ्यात या वाटेनं जात असताना हमखास माझ्याजवळ येऊन सावलीत विसावायचे. कारण माझी सावली विस्तीर्ण, दाट आणि शीतल राहायची. उन्हाच्या माऱ्यानं जिथं सारे मरगळून पडलेले असततिथं माझी कोवळी पानं त्याच उन्हात तळपत असत, चमकत असत आणि उन्ह आपल्या डोक्यावर झेलून पांथस्थांना सावली देत असत. ही अदम्य शक्ती मी त्यांना पुरवत होतो कारण भूमीचा जिवंत जीवनरस मी त्यांना पोचवत होतो. माझी मुळे जमिनीत खोलवर रुजली आहेत. त्याचा हा परिणाम होता. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीत आपली मुळे खोलवर रुजली असतील तर ऐन दुपारच्या उन्हासारखे दाहक ताप देणारेही आपलं काहीच बिघडवू शकत नाही हे मी स्वानुभवातून सिद्ध केलं आहे. 

                माझ्या सावलीत अनेक लोक येऊन बसायचे, विश्रांती घ्यायचे. एकदा एक कवीही आला होता. त्यानं माझ्यावर एक सुंदर कविता केली. मला फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत म्हणून कधी-कधी मला उदास वाटायचे. पण मी त्या कवीचा काव्यविषय झालो आहे हे पाहून माझ्या मनावरची मरगळ पार नाहीशी झाली. शिणलेल्या पांथस्थांना सावली देण्याचं व्रत मी अखंड चालू ठेवलं. तुकोबांनीही तेच केलं, म्हणून तर ते आम्हाला सोयरे मानतात. अनेकदा व्यावहारिक चिंतेने आक्रांत झालेले आणि मानसिक दुःखाने पीडित असलेले लोक माझ्या खोडाजवळ येऊन बसले आहेत. त्यांनी आपली सुख दुःखे मला सांगितली आहेत. माझ्याजवळ बसल्यानंतर मी त्यांच्या पाठीवरून गार वाऱ्याचा किंवा मंद झुळुकीचा हात फिरवत असे. त्यांना समाधान मिळत असे. आपल्यामुळे इतरांनी समाधानी व्हावं यापरतं दुसरं सुख नाही. 

                एकदा माझ्या सावलीत लग्नाची वरात थांबली होती. नवरा मुलगा चुणचुणीत होता, पण वयानं फार लहान होता. कदाचित तो बालविवाह असावा. कारण त्याकाळी बालविवाहाची पद्धत रुढ होती. तेव्हा आजच्याप्रमाणे मोटारी वगैरे फारशा नव्हत्या. नवरदेवाची वरात बंडीबैलानं नवरीच्या मांडवात जात असे. नवरदेव पहाटेला निघाला की दुपारपर्यंत हे लोक वीसपंचेवीस किलोमीटर पोचायचे. मग एखादी विहीर व झाड पाहून उतरायचे. बेसन, भाकरी असा स्वयंपाक रांधायचे. एखाद तास विश्रांती घेतल्यावर परत लग्नस्थळाकडे निघायचे. मला मोठी गंमत वाटायची. पण लहान मुलं मात्र उगीचच पानं तोडायचे, फांद्या मोडायचे आणि कधी-कधी दगडही मारायचे. त्यावेळी मला संतापही यायचा न् दुःखही व्हायचं. अरे, आम्ही मुके आहोत, आम्हाला चालता येत नाही म्हणून काय झालं? आम्हालाही भावना आहेत. कुणी कुऱ्हाड घेऊन आले, आमच्या फांद्या तोडायला आले तरी आमच्या अंगाचा थरकाप उडतो. हे जगदीशचंद्र बोसांनी पाहलं आणि साऱ्या जगाला सांगितलं. पण तरीही आम्हा मूक सजीवांवर तुम्ही घाव का घालावेत तेच कळत नाही. कोणीही प्राणी आपल्या उपकारकर्त्यावर प्रहार करत नसतो पण कृतघ्न मानवप्राणी मात्र आपल्या उपकारकर्त्यावरच निष्ठुरपणे घाव घालतो. 

                      उन्हाळ्यात मी मृगजळामागे धावत असलेल्या वेड्या हरिणांना पाहलं आहे. पावसाळ्यात आकाश आणि पृथ्वी यांची सीमारेषाच पुसून टाकणारे नद्यांचे महापूर पाहले आहेत. हिवाळ्यात शेकडो मैल लांब अंतरावरुन येणार विदेशी पक्ष्यांचे थवे बघितले आहेत.

                    मी तोही काळ पाहला जेव्हा क्रांतिकारक लपतछपत माझ्या खोडाजवळ येऊन बसत कसली तरी योजना करत आणि लपत छपतच निघून जात. सत्याग्रही मात्र राजरोसपणे येत. जंगल सत्याग्रहाची सुरुवात माझ्या सावलीतच बसून झाली होती. माझ्या खोडाजवळ एक माठ आणून ठेवलेला होता. सत्याग्रही त्यातले पाणी प्यायचे आणि जोरजाराने घोषणा द्यायचे.

                     महात्मा गांधींचा दांडी सत्याग्रह पाहण्याचं, भाग्य एका जीर्ण चिंचेच्या वृक्षाला लाभलं होतं. असं काकासाहेब कालेलकरानी 'पुराणपुरुषाला श्रद्धांजली' या लेखात लिहिलं आहे. त्या, चिचवृक्षाच्या ऐतिहासिकतेचा मला हेवा वाटतो. पण स्थानिक नेत्यांनी केलेला जंगल सत्याग्रह माझ्या डोळ्यांनी मी पाहला हेही भाग्य काही लहान नव्हे. क्रांतिकारक असोत की सत्याग्रही असोत, स्वराज्यासाठी सर्वस्वाचं समर्पण करणारी ही माणसं माझ्या सावलीत बसली होती हा माझ्या जीवनातला मला अनमोल ठेवा वाटतो.