Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

एका जीर्ण वृक्षाचे आत्मवृत्त

 

                        एका जीर्ण वृक्षाचे आत्मवृत्त                        श्री ज्ञानेश्वरांच्या अजानवृक्षाशी नातं सांगणारा मी एक पिंपळवृक्ष आहे. सर्व वृक्षात मी पिंपळवृक्ष आहे असं परमेश्वरानं गीतेत सांगितलं आहे. जेव्हा प्रलय होईल आणि पृथ्वी पाण्यात डुबून जाईल तेव्हा केवळ एकच पिंपळपान शिल्लक उरेल आणि त्यावर बाळकृष्ण खेळत राहोल असा आम्हा पिंपळवृक्षांचा पुराणात महिमा कथिला आहे. अश्वत्थ नावानं ओळखले जाणारे आम्ही पिंपळवृक्ष आहोत याचा मला अभिमान वाटतो. या परंपरेतला, सोन्याच्या पिंपळाच्या कुळातला मी एक जी वृक्ष आहे. 

                     आता जीर्ण झालो आहे, पण तारुण्याचा बहर होता तेव्हा माझ्या डेरेदारपणाची, विशालत्वाची आणि सौंदर्याची लोक केवढी तारीफ करत असत. पांथस्थ उन्हाळ्यात या वाटेनं जात असताना हमखास माझ्याजवळ येऊन सावलीत विसावायचे. कारण माझी सावली विस्तीर्ण, दाट आणि शीतल राहायची. उन्हाच्या माऱ्यानं जिथं सारे मरगळून पडलेले असततिथं माझी कोवळी पानं त्याच उन्हात तळपत असत, चमकत असत आणि उन्ह आपल्या डोक्यावर झेलून पांथस्थांना सावली देत असत. ही अदम्य शक्ती मी त्यांना पुरवत होतो कारण भूमीचा जिवंत जीवनरस मी त्यांना पोचवत होतो. माझी मुळे जमिनीत खोलवर रुजली आहेत. त्याचा हा परिणाम होता. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीत आपली मुळे खोलवर रुजली असतील तर ऐन दुपारच्या उन्हासारखे दाहक ताप देणारेही आपलं काहीच बिघडवू शकत नाही हे मी स्वानुभवातून सिद्ध केलं आहे. 

                माझ्या सावलीत अनेक लोक येऊन बसायचे, विश्रांती घ्यायचे. एकदा एक कवीही आला होता. त्यानं माझ्यावर एक सुंदर कविता केली. मला फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत म्हणून कधी-कधी मला उदास वाटायचे. पण मी त्या कवीचा काव्यविषय झालो आहे हे पाहून माझ्या मनावरची मरगळ पार नाहीशी झाली. शिणलेल्या पांथस्थांना सावली देण्याचं व्रत मी अखंड चालू ठेवलं. तुकोबांनीही तेच केलं, म्हणून तर ते आम्हाला सोयरे मानतात. अनेकदा व्यावहारिक चिंतेने आक्रांत झालेले आणि मानसिक दुःखाने पीडित असलेले लोक माझ्या खोडाजवळ येऊन बसले आहेत. त्यांनी आपली सुख दुःखे मला सांगितली आहेत. माझ्याजवळ बसल्यानंतर मी त्यांच्या पाठीवरून गार वाऱ्याचा किंवा मंद झुळुकीचा हात फिरवत असे. त्यांना समाधान मिळत असे. आपल्यामुळे इतरांनी समाधानी व्हावं यापरतं दुसरं सुख नाही. 

                एकदा माझ्या सावलीत लग्नाची वरात थांबली होती. नवरा मुलगा चुणचुणीत होता, पण वयानं फार लहान होता. कदाचित तो बालविवाह असावा. कारण त्याकाळी बालविवाहाची पद्धत रुढ होती. तेव्हा आजच्याप्रमाणे मोटारी वगैरे फारशा नव्हत्या. नवरदेवाची वरात बंडीबैलानं नवरीच्या मांडवात जात असे. नवरदेव पहाटेला निघाला की दुपारपर्यंत हे लोक वीसपंचेवीस किलोमीटर पोचायचे. मग एखादी विहीर व झाड पाहून उतरायचे. बेसन, भाकरी असा स्वयंपाक रांधायचे. एखाद तास विश्रांती घेतल्यावर परत लग्नस्थळाकडे निघायचे. मला मोठी गंमत वाटायची. पण लहान मुलं मात्र उगीचच पानं तोडायचे, फांद्या मोडायचे आणि कधी-कधी दगडही मारायचे. त्यावेळी मला संतापही यायचा न् दुःखही व्हायचं. अरे, आम्ही मुके आहोत, आम्हाला चालता येत नाही म्हणून काय झालं? आम्हालाही भावना आहेत. कुणी कुऱ्हाड घेऊन आले, आमच्या फांद्या तोडायला आले तरी आमच्या अंगाचा थरकाप उडतो. हे जगदीशचंद्र बोसांनी पाहलं आणि साऱ्या जगाला सांगितलं. पण तरीही आम्हा मूक सजीवांवर तुम्ही घाव का घालावेत तेच कळत नाही. कोणीही प्राणी आपल्या उपकारकर्त्यावर प्रहार करत नसतो पण कृतघ्न मानवप्राणी मात्र आपल्या उपकारकर्त्यावरच निष्ठुरपणे घाव घालतो. 

                      उन्हाळ्यात मी मृगजळामागे धावत असलेल्या वेड्या हरिणांना पाहलं आहे. पावसाळ्यात आकाश आणि पृथ्वी यांची सीमारेषाच पुसून टाकणारे नद्यांचे महापूर पाहले आहेत. हिवाळ्यात शेकडो मैल लांब अंतरावरुन येणार विदेशी पक्ष्यांचे थवे बघितले आहेत.

                    मी तोही काळ पाहला जेव्हा क्रांतिकारक लपतछपत माझ्या खोडाजवळ येऊन बसत कसली तरी योजना करत आणि लपत छपतच निघून जात. सत्याग्रही मात्र राजरोसपणे येत. जंगल सत्याग्रहाची सुरुवात माझ्या सावलीतच बसून झाली होती. माझ्या खोडाजवळ एक माठ आणून ठेवलेला होता. सत्याग्रही त्यातले पाणी प्यायचे आणि जोरजाराने घोषणा द्यायचे.

                     महात्मा गांधींचा दांडी सत्याग्रह पाहण्याचं, भाग्य एका जीर्ण चिंचेच्या वृक्षाला लाभलं होतं. असं काकासाहेब कालेलकरानी 'पुराणपुरुषाला श्रद्धांजली' या लेखात लिहिलं आहे. त्या, चिचवृक्षाच्या ऐतिहासिकतेचा मला हेवा वाटतो. पण स्थानिक नेत्यांनी केलेला जंगल सत्याग्रह माझ्या डोळ्यांनी मी पाहला हेही भाग्य काही लहान नव्हे. क्रांतिकारक असोत की सत्याग्रही असोत, स्वराज्यासाठी सर्वस्वाचं समर्पण करणारी ही माणसं माझ्या सावलीत बसली होती हा माझ्या जीवनातला मला अनमोल ठेवा वाटतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा