Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

28 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

 28 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ प्रार्थना

 सुखी ठेव सर्वांस देवराया...


श्लोक

 - नरस्याभरणं रुपं रूपस्याभरणं गुणः । गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ।। माणसाला रूपाने शोभा येते, पण सुंदर मनुष्य सद्गुणांनीच खरा शोभून दिसतो. गुणीजनांचा ज्ञान हा अलंकार आहे; तर ज्ञानी मनुष्याचे भूषण क्षमावृत्ती हे आहे.

 -

 चिंतन- स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई । सुखवू प्रियतम भारतमाई ।। देशभक्तीचा सुदिव्य सोम । पिऊन करू प्राणांचा होम ।। धैर्याची ती अभंग ढाल । त्यागाची ती वस्त्रे लाल ।। कष्ट हाल हे अमुचे भाई । निश्चयदंडा करात राही ।। समानतेची स्वतंत्रतेची । दिव्य पताका फडकत जाई ।।


 कथाकथन '

 जलदर्पण' - एकदा गुरु नानक हरिद्वाराला गेले होते. काही लोक पाण्याच्या प्रवाहात उभे राहून पूर्वेला असलेल्या सूर्याला जलतर्पण करीत होते. गुरु नानकांनी 'तुम्ही हे काय करीत आहात?' असा प्रश्न विचारतातच काही लोक म्हणाले, “स्वर्गवासी झालेले व सूर्यलोकात राहणारे जे पूर्वज लोखो योजने दूर आहेत, त्यांना जलाचे तर्पण देत आहोत." नानकजी हे उत्तर ऐकताच गंगेच्या प्रवाहात उभे राहून पश्चिम दिशेला तोंड करून जोरजोराने हाताने पाणी उडवू लागले. एक प्रकारची ही विचित्र चेष्टा पाहून अनेक लोक तेथे गोळा झाले व नानकांना विचारले, "नानकजी, आपण हे काय करीत आहात?" नानकजींनी सरळपणे उत्तर दिले, “मी आपल्या शेतात जलसिंचन करीत आहे.” यात्रेकरूंनी पुन्हा विचारले, "आपले शेत कुठे । आहे?" नानकजी म्हणाले, "सुमारे १०० मैल दूर असलेल्या कर्तारपूर या गावी आहे." यात्रेकरूंनी पुन्हा विचारले, "आपण उडविलेले पाणी कर्तारपूर येथील शेतात कसे पोहचेल ?" नानकजींनी उत्तर दिले, “तुम्ही तर्पण करीत असलेले पाणी लाखो योजने दूर असलेल्या सूर्यलोकापर्यंत जाऊ शकते तर मग ती उडविलेले पाणी माझ्या शेतापर्यंत सहजच जाऊ शकेल. कारण ते तर याच पृथ्वीवर फक्त १०० मैल अंतरावरच आहे. " गुरु नानकांचा हा गंभीर तर्क व युक्तिवाद ऐकून यात्रेकरू उपासकांना आपला प्रयत्न विफल असल्याचे लक्षात आले. त्यांची चूक त्यांना कळली. अंधश्रध्दा जाऊन वैज्ञानिक दृष्टी आली, आणि ते शरण गेले. कोणतीही कृती करताना वैज्ञानिक कारण जाणून घेतल्यानंतरच पुढचे पाऊल टाकू लागले. गुरु नानकांना अशा प्रकारे नानक सहजतेने लोकांमधील अंधश्रध्दा घालवीत आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करण्यास शिकवीत.


 *सुविचार- 

 *• देशातील दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रध्दा घालविणे ही ईश्वर सेवा आहे - स्वामी विवेकानंद 

• आंधळ्या श्रध्देपेक्षा डोळस बुध्दीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. - म. गांधी. 

• खोटे ग्रह व वाईट समजुती व्यवहारात फार दिवस टिकत नाहीत. 

● मनाची शुध्दता राखण्यासाठी मोह, राग आणि खोटी श्रध्दा (अंधश्रध्दा) करणे सोडले पाहिजे. - डॉ. आंबेडकर 

• दैववादी न बनता प्रयत्नवादी बनावे. • सोन्याचा कस अग्नीत लागतो, तर धैर्याचा कस संकटात लागतो. 

 

→ दिनविशेष - • सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन - १७२९ : आंग्रेचा पहिला पुरुष तुकोजी हा सन १६९० च्या सुमारास मरण पावला. नंतर त्याचा मुलगा कान्होजी हा त्यांचे काम पाहू लागला. तेव्हापासून सन १८४० पर्यंत आंग्रेची सत्ता अरबी समुद्रावर चालू होती. इंग्रजांच्या मुंबईस खेटा देऊन त्यांचे राज्य उभे होते. सन १८४० मध्ये वारसाअभावी त्याचे राज्य इंग्रजांकडे जमा झाले. त्यावेळी त्याच्या राज्याचे उत्पन्न ३ लाखाचे होते. कान्होजी हा अंगाने स्थूल, वर्णाने काळा व बांध्याने मजबूत असा होता. त्याचा चेहरा उग्र व डोळे पाणीदार होते. त्याचे हुकूम कडक असून मोडणारास जबरदस्त शिक्षा होई. एरवी हाताखालच्या लोकांशी तो फार उदार बुध्दीने, ममतेने व बरोबरीच्या नात्याने वांगे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ते कारकीर्दीत कान्होजी आंग्रे फिरते आरमार घेऊन कोकण किनाऱ्याचा बंदोबस्त करीत होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो उदयास येत होता. छत्रपती राजाराम महाराज चंदीहून आल्यावर त्यांनी सर्फराजी करून कान्होजीस 'सरखेल' हा किताब दिला. मराठेशाहीवरील आपत्तीच्या काळात कान्होजी आंग्रेने पश्चिम किनाऱ्यावरील मराठ्यांच्या सत्तेचे उत्तम प्रकारे रक्षण केले. परक्या राष्ट्रांच्या गलबतावर तो हल्ला करी. त्रावणकोर पासून मुंबईपावेतो एकंदर किनाऱ्यावर कान्होजींची सत्ता नाही असे एकही ठिकाण नव्हते. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग येथे आरमारासंबंधी सर्व साहित्याची कोठारे असून, कुलाबा हे आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. जंजिऱ्याचे हबशी, गोव्याचे पोर्तुगीज व इंग्रजांशी त्यांचे वारंवार संघर्ष होत. इंग्रजही त्याला वचकून होते. आंग्य्रांचा इतिहास म्हणजे आपल्या राष्ट्राच्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा इतिहास होय.


मूल्ये -

 • राष्ट्रप्रेम, निर्भयता, साहस,


 • अन्य घटना

 • डॉ. गोविंदकुमार मेनन यांचा जन्म - १९२८ 

 • • उर्फ शेखोजी आंग्रे यांचे निधन - १७३३ 

• स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते रावसाहेब पटवर्धन यांचे निधन - १९६९.

 • थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे.पी. नाईक यांचे निधन १९८१. 

 

उपक्रम

 • महाराष्ट्रातील जलदुर्गांची नावे व माहिती सांगा.   


→ समूहगान  

 • आम्ही बालक या देशाचे, शिकू धडे सारे विज्ञानाचे..... 

 

→ सामान्यज्ञान

 • पृथ्वीचे वर्णन 'समुद्रवसना देवी' असे प्रातःस्मरणाच्या श्लोकात केलेले आहे. पृथ्वीचा ७२ टक्के पृष्ठभाग समुद्रांच्या पाण्याने व्यापलेला आहे. दरवर्षी त्यातील सुमारे पंधराशे अब्ज टन खाऱ्या पाण्याची वाफ तयार होऊन शुध्द गोड्या पाण्याचा पावसातून पुरवठा होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा