Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी 4 पर्यावरणीय व्यवस्थापन

 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी

4 पर्यावरणीय व्यवस्थापन



■परिसंस्था म्हणजे काय? तिचे विविध घटक कोणते ?

उत्तर : एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक  घटक आणि त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया यांमुळे परिसंस्था बनते.  परिसंस्थेतील विविध घटक पुढीलप्रमाणे : अजैविक घटक - पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता वगैरे. हवा,

जैविक घटक - सर्व प्रकारचे सजीव, जसे जीवाणू, कवक, वनस्पती आणि प्राणी.

-------------------------------

(2) भक्षकांचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर  अवलंबून असतात ?

उत्तर : प्राथमिक, द्वितीय, तृतीयक किंवा सर्वोच्च असे भक्षकांचे प्रकार आहेत. निरनिराळ्या पोषणपातळ्यांप्रमाणे भक्षकांचे प्रकार असतात.

-------------------------------

(3) झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा ?

उत्तर : झाडावरील पक्षी त्यांच्या अन्नासाठी तलावातील  जिवांवर अवलंबून असू शकतात. तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावर वास्तव्य | करून राहतात. तसेच ते पिण्याचे पाणी देखील तलावातून घेतात.

-------------------------------

(4) अन्नसाखळी व अन्नजाळे यांमध्ये काय फरक आहे ?

उत्तर : प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात. प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा चार वा पाचहून अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतच असतात. परंतु अन्नजाळे हा गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते.

-------------------------------

■पुढे दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे, त्या परिसंस्थेचे लिहा : नाकतोडा - साप - भातशेती - गरुड - बेडूक. 

-1) (सराव कृतिपत्रिका )

-उत्तर : (1) योग्य अन्नसाखळी : भातशेती → नाकतोडा बेडूक साप गरुड. (2) वरील अन्नसाखळी भू-परिसंस्थेतील आहे.

(3) भू-परिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात. जसे कीटक पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी.

(4) उदाहरणात भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते. त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात.

(5) वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक, तृतीयक भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषणपातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपांतून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषणपातळीत हस्तांतरित होते.

-------------------------------

■आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर : (1) जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात, तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पात घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम

घडले आहेत.

(2) मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे.

(3) औदयोगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहेत.

(4) मानवाच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही.

(5) परिणामी, जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत. हा विकास शाश्वत नाही.(6) नैसर्गिक साधनसंपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत. उदा. जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी.

(7) आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामानबदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड दयावे लागेल. म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे...

-------------------------------

■प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून दयाल ते लिहा. (सराव कृतिपत्रिका - 1)

उत्तर : (1) प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते..

(2) प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो.

सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते..

(3) जर प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू आणि टिकू शकतील.

(4) प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यांतून पर्यावरणाचे आपसूकच व्यवस्थापन होत असते. उदाहरणार्थ, प्लास्टिक इतस्ततः टाकण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन करून पुनः चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेलच शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते.

-------------------------------

■ (5) पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल ? कसे? पर्यावरण संवर्धन करण्यासाठी तुम्ही स्वतः योजत असलेले 6 उपाय लिहा. (सराव कृतिपत्रिका - 2 )

उत्तर : ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत, त्यांचा आधी अभ्यास करू, या समस्यांवर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे, हे महत्त्वाचे आहे.

(1) झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वांत सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. देशी झाडे आणि प्रदूषण, नागरीकरण इत्यादी परिस्थितीला तोंड देणारी झाडे लावण्याचा प्रयत्न करू.

(2) घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून शाळेतून परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू. त्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे. (3) प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो. (4) जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामानबदल होत आहे. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. (5) आजूबाजूच्या पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू. (6) पर्यावरण संवर्धनाच्या माहितीचा प्रचार व प्रसार करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतींतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे.

-------------------------------

■वर्षानुवर्षे जंगलातील पालापाचोळा पडलेली झाडे इत्यादी तसेच गावपरिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर....

उत्तर : विघटन ही प्रक्रिया वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात अडकलेली मूलद्रव्ये आणि रेणू पुन्हा निसर्गात परत पाठवते. शरीर तयार होत असताना ज्या मूलद्रव्यांचा वापर केला जातो, ती जर पुन्हा निसर्गात पाठवली नाहीत तर या रसायनांचा चक्राकार प्रवास होणार नाही. केवळ विघटनानेच पालापाचोळा, मृत शरीरे इत्यादी पुन्हा निसर्गात विलीन होऊ शकतात. जर हे नेमाने चालणारे विघटन झाले नाही तर पृथ्वीवर या साऱ्यांचे ढीगच्या ढीग साचून राहतील. निसर्गाचा समतोल बिघडेल.

-------------------------------

■भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल?

उत्तर : बेडकांची संख्या कमी झाली तर, नाकतोड्यांची संख्या वाढेल. भाताच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम होईल.

-------------------------------

■(2) कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल ?

उत्तर : अन्नसाखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते. भातपीक नाकतोडे • बेडूक → साप ही अन्नसाखळी निसर्गतः सुरू असते. काही कारणांनी येथील बेडूक कमी झाले की द्वितीय भक्षक कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे, म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. सापांच्या कमतरतेने उंदीरही वाढतील. 

-------------------------------

(3) एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल ?

उत्तर : बेडूक ही मधली कडी नष्ट झाली तर परिसंस्थेतील तोल बिघडेल. भक्ष्य आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील. परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल.

-------------------------------

■पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे?

उत्तर -: (1) पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली.

(2) इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केले.

(3) पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला.

-------------------------------

■जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.

उत्तर- : जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते. या पातळ्य  ढीलप्रमाणे आहेत :आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता.आनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.

(2) प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.

(3) परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांतून दिसून

-------------------------------

■जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ?

 उत्तर : पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल :

-(1) दुर्मीळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे.

(2) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.

(3) काही क्षेत्रे 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे.

 (4) विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.

(5) प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.

 (6) पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे. 

(7) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.

-------------------------------

■जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.

उत्तर : (1) संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.

(2) ही क्षेत्रे एके काळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती

(3) आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत..(4) सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचेअखंड अवशेष शिल्लक आहेत.(5) यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत.

-------------------------------

■प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात

येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचवता येईल ?

 उत्तर : (1) प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात.

(2) नैसर्गिक कारणांपैकी भूकंप, हवामानबदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न-पाण्याची कमतरता, अशी काही ठळक कारणे आहेत.3) मानवनिर्मित कारणांत शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे, या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण, औदयोगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो.(4) या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ अनेक उपाय करतात. यांत अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच 'संवेदनक्षम क्षेत्र' या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते.

(5) निरनिराळ्या कायदयांनी आणि त्यांच्या उप-कलमांनी अन्य जीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते.

-------------------------------

■पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात ? कसे ? 

उत्तर : पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक परिणाम करतात. नैसर्गिक घटकांपैकी अचानक होणारे हवामानातले बदल, येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अशांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. अशा बदलांनी पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम होऊन अन्नसाखळी आणि अन्नजाळी यांच्या आंतरक्रियांत बाधा येते.

मानवनिर्मित कारणांनी तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. औदयोगिकीकरण व त्यामुळे होणारे प्रदूषण, नागरीकरण, वन्य प्राण्यांच्या शिकारी, धरणे, रस्ते, पूल बांधणे अशांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होत आहे.

-------------------------------

■(2) पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल ?

उत्तर : पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली.

-------------------------------

■पर्यावरणीय प्रदूषणाची कारणे लिहा.

उत्तर : मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औदयोगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात.

-------------------------------

■(2) 'युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP)' ची स्थापना कधी आणि कशी करण्यात आली ?

उत्तर : 'युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) 'ची स्थापना 1972 साली करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघटनेने (UNO) स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यांवर चर्चा झाली आणि त्यातूनच 'युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) ' ची स्थापना झाली.

-------------------------------

■किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे परिणाम कोणते ?

उत्तर : (1) किरणोत्सारी प्रारणामुळे होणाऱ्या प्रदूषणाला किरणोत्सारी प्रदूषण असे म्हणतात.

(2) हे प्रदूषण नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन कारणांनी होते.

(3) नैसर्गिक किरणोत्सार म्हणजे अल्ट्राव्हॉयोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे अशी प्रारणे जी किरणोत्सारामुळे पडतात.

(4) मानवनिर्मित किरणोत्सारात एक्स-रे, अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार हे प्रकार येतात.

(5) किरणोत्साराने आतापर्यंत जागतिक पातळीवर अत्यंत विघातक अशा दुर्घटना झालेल्या आहेत. उदा., चेर्नोबिल, विंड्स्केल आणि श्रीमाईल आयलंड.

(6) या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत

-------------------------------

■टिपा लिहा

■पर्यावरण संवर्धन-

उत्तर : (1) पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. (2) यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतिशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) ची स्थापना करण्यात आली आहे. (3) पर्यावरण संवर्धनामध्ये लोक सहभाग खूप आवश्यक आहे. - यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे.

-------------------------------

■बिश्नोई चिपको आंदोलन.

 उत्तर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी किंवा खेजडली हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथेच प्रथम विश्नोई समाजाचे आंदोलन झाले होते. खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन इ.स. 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी हिच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केलेले होते. या गावात खेजडी (Prosopis cineraria) या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. अमृतादेवी म्हणाली, "एक झाड वाचवण्यासाठी एक-एक मुंडके उडाले तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल!" अमृतादेवीला व तिच्या असू, रत्ना व भागुबाई या तिन्ही मुलींना राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. ही बलिदानाची बातमी एकून 83 गावांतले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले. अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले. राजाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. बिश्नोई समाजाच्या सन्मानार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि वृक्ष व अन्य जीवन संरक्षित ठेवण्याचे कबूल केले. विसाव्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले.

-------------------------------

■जैवविविधता.

उत्तर : निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता तीन पातळ्यांवर असते : आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. यांचा अर्थ अनुक्रमे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थांतील विविधता असा असतो.मानवाच्या विकासाच्या अनेक कृतींनी जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील.

जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारणे, राखीव जैवविभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

-------------------------------

■(4) देवराई.

उत्तर : देवराई म्हणजेच Sacred Grove. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाहीत. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले 'अभयारण्य 'च असते. सरकारचे वनखाते देवराईचा सांभाळ करीत नाही. परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलांच्या देवराया आढळतात.

-------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा