Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २४ जुलै, २०२३

25 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना

 इतनी शक्ती हमे देना दाता... 

श्लोक 

-मना, पाहता सत्य हे मृत्युभूमी । जिता बोलती सर्वही जीव मी मी । चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥

- हे मना, खरे पाहिले तर हा मृत्युलोकच आहे. हे जाणूनही सर्व जीव या जन्मात अहंकाराने 'मी', 'मी' असे म्हणत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे मानतात; पण शेवटी सारे काही येथेच (या लोकी) सोडून देऊन अकस्मात निघून जातात. (मरतात). 

चिंतन 

-दुसऱ्याच्या हितासाठी आपला जीव गेला तरी पर्वा नाही, असा विचार मनात येणे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. - स्वामी विवेकानंद

 - दुसऱ्यासाठी जगला तो जगला, असे मराठीत म्हणतात. स्वतःसाठी जगणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे; पण दुसऱ्याच्या हितासाठी जो आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाही, तो खरा भाग्यवान. दुसऱ्यांना सुखाने चालता यावे म्हणून स्वतःचे रक्त शिंपून जो कोणी मार्ग तयार करतो, तोच खरा मोठा. अशा माणसाचे जगणे हेच खरे जगणे. 

 


कथाकथन - 

'श्रावणबाळ' :

 श्रावण नावाचा एक मुलगा होता. तो खूप खूप चांगला होता. त्याचे आई-वडिलांवर खूप प्रेम होते. तो त्यांची सेवा करी नि त्यांच्या आज्ञेत राहत असे. श्रावणाशिवाय त्याच्या आईवडिलांना चैन पडत नसे. त्यांचेही श्रावणावर फार प्रेम होते. काही दिवसांनी श्रावणाचे आई- वडिल म्हातारे झाले. त्यांना चालता येईना, डोळ्यांनी काही दिसेना. काशीयात्रेला जाण्याची इच्छा झाली. ती इच्छा त्यांनी श्रावणाला सांगितली. श्रावणाने मोठ्या आनंदाने ते कबूल केले. त्याने एक मोठी कावड आणली. त्यांतल्या एक पारड्यात आईला बसविले आणि दुसऱ्या पारड्यात वडिलांना बसविले. कावड खांद्यावर घेतली आणि तो काशीला जायला निघाला. एके दिवशी रानातून जात असताना वाटेत अंधार पडला. त्याने कावड खाली ठेवली. आई • वडिलांना तहान लागली, म्हणून तो पाणी आणायला निघाला. खूप दूर गेल्यावर त्याला एका ठिकाणी तळे दिसले. श्रावणाने झाडाच्या पानांचा द्रोण केला. तो पाण्यात बुडवला तेव्हा 'बुड्डूऽऽक, बुऽडू'ऽऽक' असा आवाज आला नि इतक्यात एक बाण 'सूंऽऽसूं करत श्रावणाच्या छातीत घुसला. श्रावण “आईऽऽगं! " असे जोरात ओरडून खाली पडला. राजा दशरथाने तो बाण मारला होता. तो धावत तेथे गेला. श्रावणाला पाहून त्याला खूप वाईट वाटले. त्याने हलकेच श्रावणाचे डोके मांडीवर घेतले. त्याच्या छातीतला बाण हलकेच काढला नि म्हटले," बाळ, मला क्षमा कर. आवाजाच्या दिशेने बाण सोडला तेव्हा अंधार होता. मला वाटले एखादे हरिण पाणी प्यायला आले असावे, म्हणून मी बाण सोडला." तेव्हा श्रावण हळू आवाजात म्हणाला,“ राजा! माझेआई-वडील तहानलेले आहेत. त्यांना तू अगोदर पाणी नेऊन दे. माझी काळजी करू नकोस." असे म्हणत श्रावणाने प्राण सोडला. दशरथ श्रावणाच्या आई वडीलांकडे पाणी घेऊन गेला तेव्हा ते राजाला म्हणाले. “श्रावणबाळा, तू बोलत का नाहीस? रागावलास का रे आमच्यावर? आम्ही तुला खूप त्रास देतो का रे ? तू बोलेपर्यंत आम्ही पाणीच पिणार नाही.” शेवटी दशरथाने घडलेले सारे काही सांगितले. तो म्हणाला, “मला क्षमा करा, मलाच तुमचा श्रावण समजा. मी तुम्हाला काशीपर्यंत नेईन. माझ्या राजवाड्यात ठेवीन." तेव्हा ते म्हणाले, “आम्हाला काही नको, आम्हाला आमचा श्रावणबाळ हवा. राजा, तू सुध्दा आमच्यासारखा पुत्र-वियोगाने मरशील" असे म्हणत त्या दुःखी माता-पित्यांनी प्राण सोडला. 

 


सुविचार

 • 'आई-वडील, आचार्य व अतिथी यांना देवासमान माना' उपनिषद

  • सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय - पोप 

  → दिनविशेष

सुधीर फडके जन्मदिन - १९१९ :

 सुधीर फडके हे मराठीतील एक सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक आहेत. जन्म • कोल्हापूर येथे. शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे. १४ व्या वर्षापासून त्यांनी संगीत शिकविण्यास सुरुवात केली. १९३१ मध्ये त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. १९३७ मध्ये आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम झाला. 'हिज मास्टर्स व्हॉईस' या कंपनीत ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट संगीताबद्दल त्यांना तीन वेळा मानाचे समजले जाणारे 'फाळके' पारितोषिक मिळाले. 'हा माझा मार्ग एकला' या फडके यांनी निर्मिलेल्या मराठी चित्रपटास सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट म्हणून १९६३ मध्ये राष्ट्रपतिपदक मिळाले. ग. दि. माडगूळकरांच्या 'गीतरामायणाला' त्यांनी दिलेल्या चालींमुळे ते घराघरांतून ऐकले गेले. अजरामर झाले. गदिमांचे सुधीर फडक्यांनी स्वरबद्ध केलेले गीतरामायण म्हणजे महाराष्ट्राचा चिरंतन ठेवा आहे. गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव १९८० साली पुणे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. 

मूल्ये •संगीतप्रेम, राष्ट्रीय एकात्मता. 


अन्य घटना-

 • शहाजी राजांना विजापूरकरांनी कैद केले- १६४८.

 •  राजे लखुजी जाधव स्मृतीदिन १६२९. 

 •   कॅप्टन शि. वि. दामले यांचे निधन - १९७७.

 •    जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म - १९७८. 

    → उपक्रम 

    • गीतरामायणातील 'समूह गीते' मुलांकडून बसवून घ्यावी. 

    •  इतरांच्या उपयोगी पडण्यासाठी शाळेतील मुले काय काय करू शकतील याची त्यांना माहिती द्यावी. 


समूहगान

 • जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा .

 → सामान्यज्ञान 

 -महाराष्ट्रातील प्रमुख शास्त्रीय संगीत गायक-गायिका 

 कै. भास्करबुवा बखले 

 किशोरी आमोणकर 

 भीमसेन जोशी 

 कै. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर 

 कै. विनायकबुवा पटवर्धन 

 प्रभा अत्रे

 कै. वसंतराव देशपांडे 

  कै. दीनानाथ मंगेशकर 

  सरस्वती राणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा