Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २३ जुलै, २०२२

आपले सण- दिवाळी

                                              दिवाळी    


               

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. अशा या विविध संस्कृतीने नटलेल्या देशात विविध सण साजरे केले जातात. त्यापैकी एक सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी.दिवाळीलाच आपण दीपावली असेही म्हणतो. दिव्यांचा सण अशी या सणाची ओळख आहे. दिवाळी हा सण इंग्रजी महिन्याप्रमाणे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात असतो तर मराठी महिन्यांमध्ये अश्विन महिन्याच्या शेवटी आणि कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला असतो. सर्वसाधारणपणे शेतीची कामे संपवून शेतकरी धान्य घरी आणतात त्यानंतर भरभराट म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे असे सांगितले जाते, की प्रभू श्रीराम व सीता चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या ते मिथिला पर्यंतचा प्रदेश दिव्यांनी उजळवला होता. तेव्हापासून आपण दिवाळी हा सण साजरा करतो. 

दिवाळी सण सुरू होण्यापूर्वीच वातावरण उत्साहाचे बनलेले असते. मुलांना दिवाळी निमित्त शाळेला सुट्टी असते. नवीन कपडे, सुट्ट्या, मिठाई आणि फटाके या सर्वांमुळे दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. थोरामोठ्यांच्याही आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी दिवाळीच्या निमित्ताने भेटीगाठी होतात त्यामुळे तेही दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळी हा सण साधारणपणे पाच दिवस असतो. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत हा प्रकाशाचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी सण सुरु होण्यापूर्वीच घरातील महिला फराळाच्या तयारीला लागतात. लाडू, चकल्या,शेव, शंकरपाळी,चिवडा,अनारसे असे विविध पदार्थ तयार केले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेतले जातात. दिवाळीच्या सणात लहान मुले मुली आकाशकंदील तयार करतात, किल्ला तयार करून त्यावर चित्र मांडतात. दारापुढे सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते भाऊबीज पर्यन्त रोज पणत्या लावल्या जातात.उटणे लावून स्नान केले जाते. दिवाळीच्या सणाची सुरुवात वसूबारस या सणापासून होते.

वसुबारस : 

या दिवसाला गोवत्स द्वादशी असेदेखील म्हटले जाते. या दिवशी गाय-वासराची पूजा करून त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. घरातील बायका गाय व वासराच्या पायावर पाणी टाकतात,त्यावर हळद, कुंकू, फुले वाहतात.गाय व वासराला ओवाळून त्यांना पुरणपोळी किंवा घरात केलेले गोड पदार्थ खाऊ घालतात.

धनत्रयोदशी :

धनत्रयोदशीला धान्याची पूजा केली जाते. या दिवशी लोक नवीन वस्तू,सोने, चांदीची खरेदी करतात. धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो त्यामागे अशी दंतकथा आहे की इंद्रदेव यांनी दुर्वास ऋषी यांचा शाप दूर व्हावा म्हणून असुरांबरोबर समुद्र मंथन केले त्यातून धन्वंतरी (देवांचा वैद्य) अमृत कुंभ घेऊन बाहेर आला.आयुर्वेदात धन्वंतरीचे फार महत्त्व आहे. या दिवशी लोकांस प्रसाद कडुनिंबाच्या पानाचे तुकडे व साखर देतात.

नरकचतुर्दशी :

 कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करून त्याचा वध केला तसेच त्याच्या बंदिवासातून 16100 कन्याना सोडवले कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.या दिवशी महिला आपल्या हातावर मेहंदी काढतात, लहान मुलांना भेटवस्तु दिल्या जातात.

लक्ष्मीपूजन :

 हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. सकाळी अभ्यंग स्नान केले जाते.स्त्रिया सुंदर रांगोळी काढतात.सर्व घर सजवले जाते.या दिवशी घरातील सर्व लोकं नवीन कपडे परिधान करतात संध्याकाळी लक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीचे पूजन केले जाते. पुजनानंतर फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

बलिप्रतिपदा :

 बलिप्रतिपदा किंवा पाडवा या नावाने हा दिवस साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी एक 'पाडवा' हा मुहूर्त मानला जातो.या दिवशी बळीची पूजा करतात व इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो असे म्हणतात. बळी हा एक लोककल्याणकारी राजा होता त्याला स्मरण करून त्याची पूजा केली जाते.या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो.

भाऊबीज :

 दिवाळीचा शेवट भाऊबीज हा सण साजरा करून होतो. बहिण भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा हा दिवस.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला ' यमद्वितीया 'असे देखील म्हणतात.या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा