Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

एका वृद्धाचे आत्मवृत्त

             एका वृद्धाचे आत्मवृत्त / म्हातारपणची सुखदुःखे 



                   मधु मागशी माझ्या सख्या परी मधुघटचि रिकामे पडती घरीअसे भा. रा. तांबे म्हणतात पण मला ते पटत नाही. मला वाटते की वृद्धत्वात शरीर विकल होत असेल पण प्रतिभा अधिक तीव्र मानसिकता अधिक कणखर हृदय अधिक प्रगल्भ आणि शहाणपण अमृताहुनी गोड होत असते. म्हणूनच दुर्योधनाच्या राजसभेत आणली गेलेली द्रौपदी समेतील भीष्म, द्रोणाला पाहून उद्गारते, ती सभाच नव्हे जेथे वृद्ध नाहीत ते वृद्धच नव्हेत जे धर्म सांगत नाहीत तो धर्मच नव्हे जो सत्य सांगत नाही ते सत्यच नव्हे जे निष्कपट असत नाही. 

                   वार्धक्याचे दुसरे नाव परिपक्वता आहे. परिपक्व आम्रफल जसे मधुर तसे परिपक्व वार्धक्य शहाणपणाने मधुर झाले असते. खरं तर वार्धक्य शहाणपणावर अवलंबून असते, केसावर नव्हे. शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता नेहमी व्यस्त प्रमाणात असतात असे मला वाटते कारण म्हातारपणात जसजशी शारीरिक क्षमता कमीकमी होत जाते तसतशी अनुभवजन्य परिपक्व बौद्धिक क्षमता वाढत जाते. शरीर थकत जाते, मन प्रगल्भ होत राहते. म्हणून तर राष्ट्रपती, सरन्यायाधीश इत्यादी प्रमुख पदावरची माणसं बहुधा वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध असतात.

        म्हणून सेवानिवृत माणसं जेव्हा काही नाही, घरी बसून नुसता आराम करतो आहे असेम्हणतात तेव्हा मला त्यांचं मोठं नवल वाटते. ही माणसं घोळक्या घोळक्यानं संध्याकाळी एखाद्या वृक्षाच्या पारावर जाऊन बसतात, परस्परांना आपल्या भूतकाळातील अनुभव सांगतात, सुख-दुःखे सांगतात. त्यात बहुधा 'मी होतो म्हणून हे घडून आले, मी नसतो तर हे घडून येणे केवळ अशक्य होते असा आपल्या फुशारकीचा अहंकार असतो. म्हाताऱ्यांचा हा अनुभव सार्वत्रिक आहे असा माझा तरुण मित्र प्रवीण म्हणतो ते खरे आहे. तसेच, आपण तर बुवा सर्वात सुखी आहोत हे दुःखी असणारा म्हाताराही आवर्जून सांगत असतो, सारेच म्हातारे सांगत असतात हाही प्रवीणचा अनुभव बऱ्याच अंशी खरा असल्याचा माझा अनुभव आहे. ही माणसे भूतकाळातच रमतात, म्हणून वर्तमान त्यांना आवडत नसतो. वर्तमानात वावरणाऱ्या तरुणांच्या जीवनपद्धतीबद्दल त्यांना तिरस्कार असतो आणि आमच्या राज्यात चालत नव्हते असले धेर या शब्दात ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. यातून जनरेशन गॅप निर्माण होते. वृद्धाश्रमाच्या निर्मितीत तरुणांचा दोष असेलही पण वर्तमानाशी जुळवून न घेणारे म्हातारेही याला कारण आहेत. द्रौपदीचा वृद्ध वृद्धाश्रमात कधीच जाणार नाही. तो म्हणेल, मला अजून कितीतरी कामं करायची आर्हत कुटुंबासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठीही विश्रांती घ्यायला वेळच नाही. 

                  वृद्धत्व म्हणजे अलौकिक आनंदाचा अनुभव असे माझे मत आहे. बोबडे बोलणारी छकुली आपल्या आईवडिलांशी कट्टी घेते आणि माझ्या मांडीवर येऊन बसते. काल सांगितलेलीच कहाणी आजही सांगण्याचा हट्ट धरते. तिला केव्हाही काहीही आठवत असते. आपण कुणाशी काही बोलत असलो की मध्येच तिला आठवलेले ती आपल्याला बळजबरीने ऐकवते. कितीही महत्त्वाची चर्चा चालू असू द्या, 'आपण काल रिक्षानं गेलो होतो की नाही?' हे तिला आठवलेल आपण ऐकायलाच हवं असते. अशा लहानग्यांच्या सान्निध्यात आपण सारे दुःख, साऱ्या वेदना विसरून जातो. रोखे घोटाळ्यात, गाळे प्रकरणात अथवा हवालाकांडात मिळवलेल्या करोडो रुपयापेक्षा एक चॉकलेट मिळवण्याचा ह्या चिमुकल्यांचा आनंद कितीतरी मोठा असतो, म्हणून त्यांना हा आनंद मिळवून देणारे आजोबाही अपार आनंदाचे धनी होत असतात. यावेळी आजोबा जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. माझ्या नातींच्या संगतीत मलाही माझे बालपण आठवून जाते. त्यांना गोष्टी सांगताना, त्यांना बागेत नेताना, त्यांच्यासोबत हातावर हात ठेवून कान धरणे, पावसाचे गाणे म्हणत म्हणत डोलणे आणि त्यांच्या भाषेत त्यांच्यासारखे तोतडे बोलणे, हे सारे करताना वयाने मीही त्यांच्याएवढाच होऊन जातो. सारे आयुष्य स्वार्थात घालवलेले आपण यावेळी किती निरागस होत असतो. 'वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवींचा असे असे कवी म्हणतो, पण मला वाटतं हा बाणा सारेच शहाणे वृद्ध जपत असतात. प्रा. ना. सी. फडके यांनी 'म्हातारपणाचे फायदे अनेक सांगितले आहेत, पण मर्मबंधातली ही ठेव मात्र उलगडलेली नाही. 

                  जी. ए. कुळकर्णी लिखित 'राणी' या कथेतील म्हाताऱ्या भाऊंची व्यथा मात्र खरी आहे. एकदा अशा एका प्रसंगी मीही रडलो होतो. एक लहानशी गोड मुलगी एक वर्ष या पृथ्वीवर राहली, तिचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा झाला आणि लगेच तीन चार दिवसांनी अचानक ती आम्हाला कायमची सोडून गेली, अगदी आमच्या डोळ्यांदेखत आम्ही अगतिकपणे पाहत होतो पण काहीच करू शकलो नाही. त्यावेळी माझा प्राण देऊन तिला वाचवता आलं असतं तर प्राणही दिले असते. मी पिकलं पान अजून जगतो आहे आणि ती उमलती कळी मात्र करपून गेली! त्या आठवणीनं की काय अजूनही कधी कधी कोठुनी येते मला कळेना उदासीनता हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला असा एखादा क्षण सोडला तर एरवी तारुण्यातही जे कर्तृत्व आपण गाजवू शकलो नाही ते करून दाखवण्याची प्रेरणा व जिद्द माझ्या या वृद्धत्वात पुन्हा पुन्हा उसळून येते. आपल्या अनुभवाचे अमोल बोल ऐकवण्यासाठी मला प्रामाणिक आत्मचरित्र लिहावंसं वाटतं. 'जुने जाऊया मरणालागुनी, जाळूनी अथवा पुरुनी टाका' हे माझ्या अंतसमयी प्रत्यक्षात घडून यावं म्हणून मृत्युपत्र लिहावंसं वाटतं.

                  मावळतानाही सूर्य आभाळाला रंग देऊन जातो तो सूर्याचा वारसा मलाही चालवावासा वाटतो. आणि वाटतं, माझ्या संदर्भात माझ्या कुटुंबीयांनी भावी पिढयांनी म्हणावं, तिमिरात उमटली तेजाची पाऊले जाहली जगाची सले क्षणामधि फुले

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा