Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २५ जुलै, २०२३

26 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

         26 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ




प्रार्थना

 : सृष्टिकर्ता ईश प्यारे, एक हो तुम एक हो...

 → श्लोक

  - मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनी मागुता जन्म घेते ॥

  -  हे मना, एक जण मरतो, त्याचा शोक दुसरा करीत राहतो. पण तो दुसराही काही काळाने मरण पावतोच, तरीही माणसाला लोभ सुटत नाही. लोभी मनुष्य अतृप्तच राहतो, तळमळत असतो. म्हणूनच या जन्मी अपुऱ्या राहिलेल्या वासना तृप्त करून घेण्यासाठी पुन्हा जन्म घेत असतो. 

चिंतन 

- शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र होतो 

- मानवी जीवनात सर्वांत चांगली कोणती गोष्ट असेल तर पावित्र्य, मांगल्य. त्यामुळे प्रसन्नता वाढते. सकाळी उठल्यानंतर स्नान केले की एकदम ताजेतवाने वाटते, हा तर सर्वांचाच अनुभव आहे. खोटे बोलले तर आपल्यालाच आपले मन खात राहते. 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते' यात ज्ञानासारखे दुसरे काहीच पवित्र नाही, असे सांगितले आहे. म्हणूनच मनू म्हणतो, ‘शरीर पाण्यामुळे स्वच्छ होते, मन सत्य बोलण्यामुळे, तर आत्मा ज्ञानामुळे पवित्र होतो.'

 → कथाकथन

-ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 - छंदामध्ये सर्वात चांगला छंद वाचनाचा, हा छंद प्रत्येक विद्यार्थ्याला असायलाच हवा. हा वाचनाचा छंद ज्याला जडतो त्याला पुत्तकाशिवाय मग काही सुचतच नाही. नानाविध माहिती देणारी पुस्तक म्हणजे ज्ञानाचं भांडार. 'ग्रंथ हेच गुरू होय. ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर पुस्तकाला आपले जवळचे मित्र मानत. वाचण्याच्या या छंदापायी त्यांनी जवळपास चाळीस हजार पुस्तके स्वतःजवळ संग्रहित केली होती. मिळेल तेव्हा कोणत्याही ठिकाणी अगदी बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, कोठेही कोणत्याही जागी ते जवळचे पुस्तक काढून वाचनात मग्न होत. मधमाशीप्रमाणे त्यांनी ज्ञानसंचय केला. त्याच्या शैक्षणिक जीवनातला एक प्रसंग मोठा प्रेरक आहे. डॉ. बाबासाहेब भारतातले शिक्षण संपवून ते परदेशात म्हणजे इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होते. अभ्यासासाठी आवश्यक असणारी पुस्तके, ग्रंथ विकत घेणे त्यांना शक्य नव्हते. ती पुस्तके मिळविण्यासाठी ते तेथील विद्यापीठाच्या ग्रंथालयात जात. ग्रंथपालाला हवं ते पुस्तक मागत ग्रंथालयात बसून नोट्स काढीत. जेवढा वेळ ग्रंथालय उघडं असेपर्यत ते ग्रंथालयातच बसलेले असायचे. वाचताना त्यांना कडाडून भूक लागे. भुकेपुढे चित्त विचलित होई आणि वाचनात लक्ष लागत नसे. यावर बाबासाहेबांनी एक युक्ती योजली. आपल्या पँटच्या खिशात पाव म्हणजे ब्रेड घेऊन जात आणि भूक लागली की, गुपचूप पावाचे तुकडे तोंडात टाकत. त्यांची ज्ञानसाधना अशा प्रकारे बिनभोभाट सुरू होती, पण एक दिवस पुस्तक वाचणाऱ्या आणि त्यासोबत पाव खाणाऱ्या बाबासाहेबांना ग्रंथपालाने पाहिले. त्याला आश्चर्य वाटले. बाबासाहेबांचा नम्र, शालीन आणि अभ्यासू स्वभाव ग्रंथपालाला आवडत होता. म्हणूनच त्याने बाबासाहेबांना ग्रंथालयात बसून वाचण्याची परवानगी दिली होती. दुर्मिळ अशी पुस्तके ग्रंथपाल बाबासाहेबांना देत असे. ग्रंथपालानं बाबासाहेबांना जवळ बोलावून घेतलं बाबासाहेबांना वाटले आता आपली धडगत नाही. ते नम्रपणे ग्रंथपालासमोर येऊन राहिले. त्यांना पाहताच ग्रंथपाल त्यांना म्हणाले, मिस्टर आंबेडकर हे ग्रंथालय आहे. ग्रंथालयाचे काही नियम असतात. समोर ठळक अक्षरातील लावलेली पाटी दिसते ना ! येथे काही खाऊ नये, घाण करू नये, स्वच्छता राखा अशी सूचना त्यावर आहे. बाबासाहेबांनी सूचना वाचली आणि खाली मान घातली. हा येथील नियम तुम्ही मोडला आहे. अपराध केला आहे. तुम्हाला शिक्षा करावी लागेल. ग्रंथपालसाहेब माझी चूक झाली यापुढे मी या सूचनेचे तंतोतंत पालन करील, पण मला ग्रंथालयात येण्यास मनाई करू नका. ग्रंथाना मी गुरू मानतो. मित्र मानतो. ग्रंथाशिवाय मी जगू शकणार नाही. यापुढे मला कितीही भूक लागली तरी ग्रंथालयात मी पाव खाणार नाही मला कोणतीही शिक्षा करा ती मी आनंदाने भोगीन, पण मला ग्रंथालयात येऊ द्या. बाबासाहेबांचे ग्रंथावरील हे अतिशय प्रेम पाहून ग्रंथपाल मनातून सुखावला. त्यांच्या ग्रंथालयात आजवर अनेक वाचक आले होते. पण आंबेडकरासारखा पुस्तकांचे वेड असलेला विद्यार्थी कधीच पाहिला नव्हता. मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासून माझ्यासोबत जेवायचे. मी तुमच्यासाठी जेवण आणत जाईन. हीच मी ग्रंथपाल या नात्याने शिक्षा करतोय. गोऱ्या इंग्रज ग्रंथपालाने सांगतलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले. ग्रंथपाल साहेबांचे त्यांनी खूप आभार मानले. आपल्या आयुष्यात बाबासाहेबांनी अगणित पदव्या संपादन केल्या. विपुल ग्रंथलेखन केले. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचं भाग्य त्यांना लाभलं. ते भारत मातेचे लाडके सुपूत्र ठरले. या त्यांच्या जीवनातील कथेतून तुम्ही काय बोध घ्याल? पुस्तक वाचनाचा छंद जोपासायचा आणि पुस्तकांची निगा राखायची. 



सुविचार:- 

• वाचनामुळे मनुष्यास आकार येतो. सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखानामुळे तो सर्वागीण होतो.

 • वाचाल तर वाचाल 

दिनविशेष 

• राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांना आरक्षण लागू केले.

- १९०२ कोल्हापूर राज्यास ते १७ मार्च १८७४ रोजी दत्तक गेले आणि २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचे राज्यारोहण झाले. ते सामजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते होते. शिक्षणाशिवाय उद्धार होणार नाही हे जाणून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्यता निवारणासाठी कायदे केले. गुन्हेगार म्हणून हजेरी असणाऱ्या अस्पृश्य  जमातींची हजेरी बंद केली. समाजातील जतिभेद नष्ट होण्यासाठी त्यांनी विविध अंगांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी धरणे बांधली. सहकारी  चळवळीची बीजे रोवली. राज्याच्या औद्योगिक विकासासाठी औद्योगिक शिक्षण संस्था काढली. नाटक, संगीत, चित्रकला, चित्रपट यांच्या वाढीसाठी कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि सढळ हाताने मदत केली. क्रीडा-विशेषतः कुस्तीची आवड लोकांत निर्माण व्हावी म्हणून प्रसिद्ध खासबाग मैदान बांधले. विविध क्षेत्रांतील कलावंत आणि पहिलवान यांना आपल्याजवळ ठेवून घेतले. गुणीजनांचा आश्रयदाता, ललितकलांचा भोक्ता, दलिताचा उद्धारक अस लोकांचे राजे होते. शाहू महाराजांनी प्रथमच बहुजनांना सर्वच स्थरामध्ये आरक्षण लागू करून आपल्या कार्याचा ठसा जनतेवर उमटविला. १९२२ साली त्यांचे निधन झाले

मूल्ये- • सामाजिक बांधिलकी, समानता, सहकार, संवेदनशीलता.

 → अन्य घटना 

 • श्रीबचेंद्र स्वामींचा समाधी दिन - १७४५

 • इंग्रजीतील प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म - १८५६ 

 •  अपोलो- १५ चे चंद्राकडे उड्डाण - १९७१

 • पहिल्या महायुद्धास आरंभ - १९१४ 

उपक्रम 

विद्येचे महत्त्व सांगणारे संस्कृत श्लोक मुलांना शिकवावेत. 

• राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती द्यावी. 

समूहगान

• ऐ मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा.......

 → सामान्यज्ञान 

 • दक्षिण गंगोत्रीवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला- आदिती पंत

 •  इंग्लिश खाडी पोहून जाणारी- आरती साहा 

 • पहिली महिला वैमानिक -प्रेमा माथूर 

 • पहिली स्त्री मुख्याध्यापिका - सावित्रीबाई फुले. 

 • पहिली महिला पोलिस अधिकारी- किरण बेदी 

 • पहिली महिला पोस्टमन -कौसल्या खोब्रागडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा