Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज






            माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून, महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी ३०० वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशा वेळी शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य स्थापन' करून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला.

               युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील 'शिवनेरी' किल्ल्यावर १९ फेब्रुवारी, १६३० रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला.                      जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण, महाभारतातील शूरांच्या कथा सांगितल्या म्हणूनच स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर 'शिवभारत' घडले. आजच्या मातांनी आपल्या मुलांना हे 'शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉ. कलामांच्या स्वप्नातील 'व्हिजन भारत' साकार झाल्याशिवाय राहणार नाही. 

            वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्ष ठेऊन, आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने 'स्वराज्याची शपथ घेतली. अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्निदिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वासही नेले. 

          त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यांसारख्या प्रांतात स्वत: फिरून लोकांची परिस्थिती, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल आस्था निर्माण केली. एक कवी म्हणतो, 'माणसांना अस्मितेचे भान यावे लागते. पायचाटू श्वापदांची इन्सान व्हावे लागते!' या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील माणसांना स्वत:च्या अस्मितेचे भान करून देण्याचे काम शिवरायांनी केले. 

         त्यामुळेच इथल्या माणसांना स्वराज्याचे महत्त्व पटले आणि त्यातूनच तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर, नेताजी पालकर यांसारखी अनेक तरुण मंडळी शिवबांभोवती जमा झाली आणि याच मावळ्यांनी पुढे स्वराज्याचा गोवर्धन स्वत:च्या हातावर पेलला.                 रणांगणावर योद्धा लढत नसतो, त्याचे हात किंवा हातातील समशेर ही लढत नसते, लढत असते ते फक्त त्याचे मन! शिवरायांनी हीच लढणारी मनं घडविण्याचे महान कार्य केले. परकीयांशी लढण्याअगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून स्वराज्याची पायवाट मोकळी केली.                अफजलखानाचा प्रतापगडावर   वध करून स्वराज्यावरील पहिले मोठे संकट शिवरायांनी सहज धुळीस मिळवले. पन्हाळा गडावरून केलेली सुटका आणि शाहिस्तेखानाची केलेली फटफजिती यातून शिवाजींनी स्वत:ची आणि आपल्या सहकारी मावळ्यांची योजनाबद्धता काळालाही सिद्ध करून दाखविलि.

            औरंगजेब बादशहाच्या कैदेतून अद्भूत सुटका करून घेऊन संपूर्ण भारतवर्षाला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. या आणि अशा अनेक संकटांनी सामना करत-करत शिवरायांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व देदीप्यमान बनत गेले.

            शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य कुणा एकट्या-दुकट्याचे नव्हते तर, ते संपूर्ण रयतेचे होते. स्वराज्यात सर्व जातिधर्मातील माणसांना स्थान होते. भ्रामक- भोळ्या समजुती आणि परंपरांचे मात्र तिथे उच्चाटन होते आणि म्हणूनच ते स्वराज्य म्हणजे एक प्रकारचे समाजपरिवर्तनच होते. 

            समाजपरिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे, जनतेच्या कल्याणाचे राज्य होते. आणि असे राज्य उभे करणारे शिवछत्रपती हे 'रयतेचे राजे' होते. 

             जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा